बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याच्यावर कारवाईचा फास आणखी घट्ट झाला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दिल्लीत धाड टाकून त्याला ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले याच्याविरोधात नवीन गुन्ह्यांची नोंद झाली होती.
कासले याच्यावर सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य, तसेच काही राजकीय नेत्यांविरोधात केलेले गंभीर आरोप या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या विधानांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त झाली होती. त्यामुळेच मुंबई गुन्हे शाखेने तातडीने पावले उचलून दिल्लीमध्ये सापळा रचत ही कारवाई केली.
अटकेनंतर कासले याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, यापुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे आहे. कासले याच्याविरोधात अन्य काही गंभीर प्रकरणांची चौकशीही सुरू असून, त्याच्या ऑनलाईन सक्रियतेचा तपास सायबर गुन्हे विभाग करत आहे. एकेकाळी पोलीस खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कासले याच्याविरोधात आता कायदेशीर कारवाईचा वेग वाढल्याचे चित्र आहे.